Ad will apear here
Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग चार
हेदवीची बामणघळ

‘करू या देशाटन’
सदराच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील, तसेच आसपासच्या परिसरातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
.............
गुहागर तालुक्यात भटकंती करताना तीर्थयात्राही होते. शतकानुशतके येथे हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत. १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शृंगारतळी येथे गाडीचे चाक पंक्चर झाले, म्हणून थांबलो होतो. गाडीच्या बाजूला उभा होतो. पलीकडे एक व्यक्ती माझ्याकडे पाहत होती. मी बघून स्मित केले. ती व्यक्ती हसली. मग मी पुढे गेलो. ‘मी निसारखान सरगुरो...’ ते म्हणाले. मग मी माझीही ओळख करून दिली. ते गुहागरबद्दल भरभरून बोलू लागले पत्रकार असलेले निसारखान उत्स्फूर्तपणे बोलत होते. विषय पर्यटनावर आला. ते लगेचच म्हणाले, ‘खरं सांगू? गुहागरची ओळख डॉ. नातूंनी त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून पुणे-मुंबईच्या लोकांना करून दिली. गुहागरचे देवळांबरोबर निसर्गाचेही महत्त्व पर्यटकांना दिसून आले. देवाधर्माच्या कारणाने का होईना त्यांनी या मंडळींना आपल्या मूळ गावी येण्यासाठी प्रोत्साहित केले. हळूहळू गुहागरचे पर्यटनविषयक महत्त्व कर्णोपकर्णी वाढत गेले.’

गाडीचा टायर जोडून झालेला पाहून मी उठलो. लगेचच त्यांनी मला त्यांनी संपादित केलेली दूरध्वनीदर्शिका मला दिली. त्या दर्शिकेत आसपासची थोडक्यात माहितीपण होती. गुहागर हे या परिसरातील पर्यटनाचे केंद्रस्थान आहे. आसपास भरपूर काही बघण्यासारखे आहे. येथे किमान दोन दिवस तरी मुक्काम हवा. सकाळी उठावे कोकणी थाटाचा दडपे पोहे, तांदूळपिठाचे घावन, आटवल भात (मेतकुटासह) असा नाश्ता करावा व बाहेर पडावे, आसपास फिरावे दुपारी जेवण करून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा बाहेर पडावे. फिरतफिरत संध्याकाळी किनाऱ्यावर यावे. वाळूत रेघोट्या ओढत सूर्यास्त पाहावा, शहाळ्याचे पाणी प्यावे, परत संध्याकाळी आवडीप्रमाणे बिरड्याची उसळ, कुळथाचे पिठले, केळफुलाची भाजी, हंगामाप्रमाणे कच्च्या फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ, मोदक, किंवा मत्स्याहारींनी सुरमई, पापलेट, बांगडा असे अनेक प्रकारचे मासे यांवर ताव मारावा, सोलकढी प्यावी, काजू खाऊन मुखशुद्धी करावी. आणखी काय हवे?

खूप महत्त्वाचे : समुद्रावर जाताना पर्यटकांनी भरती-ओहोटीचे वेळापत्रक कसे ठरवतात, याचे कोष्टक माहिती करून घ्यावे. ज्या दिवशी तुम्ही कोठल्याही समुद्रकिनाऱ्यावर असाल, त्या दिवशीच्या तिथीची पाऊणपट करावी. थोडक्यात चतुर्थी असेल, तर पाऊणपट म्हणजे तीन. त्यात एक आकडा मिळवल्यावर चार बेरीज होते. म्हणजेच चार ही भरतीची वेळ असेल व १२ तासांनी पहाटे चार वाजता ओहोटी होईल. साधारण रोज १५ मिनिटांचा फरक पडत जातो. ओहोटीच्या वेळी पाणी मागे ओढले जाते. त्या वेळी धोका जास्त असू शकतो. हे लक्षात घ्यावे.

व्याडेश्वर मंदिरातील नंदीचे शिल्प
गुहागर : गुहा म्हणजे बुद्धी, तिचे आगर म्हणून गुहागर. काहींच्या मते, गुह म्हणजे कार्तिकस्वामी व त्याच्या नावावरून गुहागर. काहींच्या मते येथे मोठ्या प्रमाणावर गो (गाय) गृहे (गोठे) होते, म्हणून गुहागर. अशी नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पाच किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण, नारळी-पोफळीच्या झाडांची हिरवी किनार असलेला येथील किनारा आबालवृद्धांचे आकर्षण ठरला आहे. येथील श्री व्याडेश्वर अनेक कुटुंबांचा कुलस्वामी आहे. गावात रस्त्याच्या दुतर्फा तीन-चार फुटांची चिऱ्याची भिंत असलेली संरक्षक भिंत व त्यामागे टुमदार घर व मागे वाडी अशी बहुतेक घरांची रचना आहे. गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवासव्यवस्था उपलब्ध आहे. समुद्रकिनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत. 

देव व्याडेश्वर : गुहागर एसटी स्टँडजवळच मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात असलेल्या वाड्या व त्यांचा हा देव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या स्थानाला ‘व्याडेश्वर’ संबोधले जाते. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून, समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांत गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे. 

लक्ष्मीनारायण, गुहागरलक्ष्मीनारायण मंदिर : गुहागरमधील खालचा पाट भागात हॉटेल कौटिल्यजवळ २५० वर्षांपूर्वीचे पेशव्यांचे सरदार हरिपंततात्या फाडले यांनी बांधलेला मंदिरसमूह आहे. येथे यापूर्वीही मंदिर असावे, असे संदर्भ मिळतात. संपूर्ण दगडी तटबंदी असलेल्या मंदिरात श्री विष्णू-लक्ष्मीची बाजूला असलेला गरुड व मागे पितळेच्या प्रभावळीसह संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. मंदिर परिसर स्वच्छ व शांत आहे. 

श्री दुर्गादेवीचे मंदिर : गुहागर शहरातील वरचापाट भागात श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मार्गावर मुख्य रस्त्यालगत देवीच्या नावाने खांब उभारला आहे. मंदिर प्रांगणात पंचायतन असून, त्यामध्ये श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री कृष्णेश्वर व समोरचा पिंपळ हे श्री भगवान सूर्यनारायणाचे मंदिर आहे. दर वर्षी येथे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. श्री दुर्गादेवीच्या कमानीजवळ कै. शिवरामशास्त्री शारंगभट खरे व मंदिराची रचना करणारे कै. पद्माकरभट दातार यांची समाधी आहे. समाधीच्या पुढच्या बाजूस कै. कृष्णाभट खरे यांनी बांधलेले कृष्णेश्वराचे मंदिर आहे. कृष्णेश्वराच्या मंदिरासमोर देवीचे तळे असून, त्यात एक लाकडी मल्लखांबासारखा सागवानी लाकडाचा खांब आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला असला, तरी जुन्या लाकडी कोरीवकामाचा वापर केला आहे. अतिशय सुंदर अशी श्री दुर्गादेवीची अष्टभुजा, संगमरवरी मूर्ती संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर उभी आहे. देवीच्या हातामध्ये चक्र, अंकुश, सर्प, त्रिशूळ, शंख, घंटा, परशू असून, महिषासुराची शेंडी धरलेली दाखविली आहे. 

दुर्गादेवी मंदिर, गुहागर

कार्तिकस्वामी मंदिर :
वरचा पाट भागात कार्तिकस्वामी मंदिर आहे. येथे एक फूट सहा इंच उंचीची मूर्ती आहे. पूर्वी येथे फक्त शिळा होती. १९९५मध्ये जीर्णोद्धाराच्या वेळी संगमरवराची मूर्ती बसविण्यात आली. 

उफराटा गणपतीउफराटा (उरफाटा) गणपती : सुमारे ३०० वर्षापूर्वी कोळी लोकांना समुद्रात ही मूर्ती सापडली. तिची स्थापना करताना ती पूर्वाभिमुख होती. स्थानिक कथेप्रमाणे असे सांगितले जाते, की एकदा समुद्र खूपच खवळला होता व त्याचे पाणी गुहागरमध्ये शिरेल अशी भीती वाटू लागली. सर्व लोकांनी श्री गजाननाचा धावा सुरू केला. अखेर भक्तांच्या हाकेला बाप्पा धावून आला. त्याने आपले मुख पूर्वेकडून सागराच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेला केले. त्याबरोबर सागर शांत झाला. दिशा बदलल्याने याचे नाव उरफाटा गणपती पडले. 

बिवलीचा लक्ष्मीकेशवबिवली : ‘बिवलीचा लक्ष्मीकेशव’ प्रसिद्ध आहे. शाळिग्रामापासून बनविलेली लक्ष्मीकेशवाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक तर येतातच; पण या शिल्पाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासकही येतात. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या प्रकारच्या मूर्तीस केशवमूर्ती म्हणतात. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी गावोगावचे लोक देवळातील सुंदर मूर्ती त्या काळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून देत असत किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवूत असत. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी बसवली. हे नीळकंठशास्त्री थत्ते न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले होते. चिपळूणपासून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कोकणात श्री विष्णूची अनेक मंदिरे आहेत. दिवेआगरपासून अशा मूर्ती दिसून येतात. साधारण शिलाहार व होयसळ शैलीचा प्रभाव या शिल्पांवर दिसून येतो. ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. प्रत्येक मूर्तीच्या शिल्पामध्ये वेगळेपण असले, तरी शैली एकच दिसून येते. मूर्ती सालंकृत असून, डोक्यावर समृद्धीचे प्रतीक असलेला शोभिवंत मुकुट आहे. तसेच ‘तीन माळा गळा’ शोभून दिसतात. यातील एका माळेतीळ पदकात आंबे दिसून येतात. बारकाईने पाहिल्यास अनेक दागिने कोरलेले आढळून येतात. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे. 

दोणवली : हे चिपळूण तालुक्यातील एक निसर्गरम्य ऐतिहासिक गाव आहे. गावात पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर उभे आहे. गाभाऱ्यात संगमरवरी पाषाणाची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची सुबक मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी जांभा दगड, गूळ, चुना इत्यादींपासून केली आहे. हे मंदिर इ. स. १७७४दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिराच्या पिछाडीस ओहोळावर असलेला मोठ्या आकाराच्या जांभ्या दगडापासून तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल बघण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक येत असतात. खेकडे संवर्धनासाठी या गावाची निवड करण्यात आली आहे. 

मळण - आनंदीबाईंचे माहेर : राघोबादादांच्या पत्नी व महत्त्वाकांक्षी आनंदीबाई यांचे माहेर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनाव ओक असे होते. आजही या कुटुंबाची येथे घरे आहेत. आनंदीबाईंच्या माहेरच्या वाड्याचा चौथरा आणि त्या काळचे तळे पाहता येते. शृंगारतळीहून मळणला जाण्यासाठी मार्ग आहे. 

पालशेत गुंफा : २००१मध्ये प्रथमच डेक्कन कॉलेजमधील पुरावास्तू संशोधक अशोक मराठे यांनी सुसरोंडी येथील ही गुंफा शोधून काढली. सुमारे ९० हजार वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवी वस्ती असल्याचा पहिला पुरावा येथे मिळाला. येथे अश्मयुगीन हत्यारेही सापडली. ट्रेंर्किंगची आवड व पुरावास्तू अभ्यासाची आवड असणाऱ्यांनी येथे जरूर भेट द्यावी. 

कोंडकारूळ गरम पाण्याचा झरा : बोऱ्याबंदरजवळच एका टेकडीवर खडकातून सतत गरम पाणी पाझरत असते. 

बुधल समुद्रकिनारा

बुधल :
ज्याला इंग्रजीमध्ये लँडस्केप म्हणतात, अशी भरपूर ठिकाणे कोकणामध्ये आहेत. अशांपैकी एक म्हणजे वेळणेश्वरच्या उत्तरेला असलेले बुधल हे छोटेखानी गाव. हे या वर्णनात चपखल बसते. गावाच्या कडेला असलेल्या काळ्या खडकांवर समुद्राच्या लाटांचे सतत थैमान चालू असते. याकडे बघता बघता वेळ कसा जातो समजत नाही. अर्धवर्तुळाकार पुळण, रूपेरी वाळूचा छोटा किनारा हे थोडा वेळ तरी अनुभवावे. 

वेळणेश्वर  मंदिर

वेळणेश्वर दीपमाळवेळणेश्वर : कोकणातील सुंदर सागरकिनाऱ्यांपैकी वेळणेश्वरचा किनारा प्रसिद्ध आहे. लांबवर असणारा सुरक्षित किनारा म्हणून हा ओळखला जातो. कोळ्यांची वस्ती मोठी असल्याने काठावर नांगरलेल्या होड्या समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असतात, हे दृश्य खूप छान दिसते. उंच डोंगरातील घाटातून खाली येताना सागराचे विलोभनीय दर्शन होते. वेळणेश्वर हा मी पाहिलेला पहिला समुद्रकिनारा आहे. ५० वर्षांपूर्वीची शांतता आता येथे राहिली नाही, तरी या भागात आल्यावर येथे आल्याशिवाय चैन पडत नाही. पूर्वी किनाऱ्यावर वाळूत पावलांचे ठसे अजिबात नसायचे. आता पर्यटक खूप येतात. किनाऱ्याची नैसर्गिक शोभा मात्र तशीच आहे. अद्यापही संपूर्ण किनारा जणू नारळाच्या उंच झाडांनी सजविला आहे असे वाटते. 

वेळणेश्वर किनारासमुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे, त्याला ‘मेरुमंडल’ म्हणतात. हे मंदिर साधारण सन ११०० ते १२००मधील आहे. आदिलशहाच्या पदरी काम करणारे येथील गोखले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हणतात. मंदिर प्रांगण खूपच मोठे आहे. त्यात ३० फूट उंचीची देखणी दीपमाळ आहे. घुमटाकार तीन शिखरे आहेत. गाभाऱ्यात तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून, त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालिमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या, तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणमूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. कोकणातील लोक श्रद्धाळू आहेत. स्थानिक लोक या काळभैरवाला कौल लावताना पाहायची संधी मिळाल्यास जरूर घ्यावी. 

हेदवीचं दशभुजा गणेश मंदिरहेदवी : अप्रतिम निसर्गाच्या सान्निध्यात असलेले येथील दशभुजा गणपती मंदिर महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे आवडते ठिकाण झाले आहे. निसर्गाच्या कोंदणात वसलेले हे टुमदार मंदिर पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे. मंदिराचे बांधकाम साधारण १७६० ते ७५ या कालावधीत केळकरस्वामींनी केले व त्यासाठी पेशव्यांनी मदत केली होती, असे सांगितले जाते. मंदिर टेकडीवर असून, पाहावे तिकडे गर्द झाडी आहे. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा-फुलांच्या बागा यांमुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व इथल्या परिसराच्या प्रेमात पडतोच. देवदर्शनाइतकेच निसर्गाचेही पर्यटकांना प्रेम असतेच. 

दशभुजा गणेशमंदिरातील मूर्ती ही पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून, उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमल, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून, सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून, अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता, ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. (अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हेदवीची बामणघळ : हेदवीचा समुद्रकिनारा खूप छोटा आहे; पण आकर्षक आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे बामणघळ. समुद्राच्या पाण्याचा मारा व दबाव यामुळे येथे खडकाला पडलेल्या दोन ते तीन फूट रुंद, १५ फूट खोल आणि २०-२५ फूट लांबीच्या घळीतून भरतीच्या वेळी एखाद्या कारंज्यासारखे उंच पाणी उडते. हे खूपच आकर्षक दिसते. भरतीची वेळ पाहून येथे जावे. 

गोपाळगड

गोपाळगड :
वाशिष्ठी नदीच्या मुखावर अंजनवेलजवळ सागरी दुर्ग या प्रकारात मोडणारा गोपाळगड शतकानुशतके उभा आहे. हा किल्ला नक्की कधी व कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरापासून (दाल्भेश्वर) चिपळूणपर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला बांधण्यात आला. सन १६६०मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला, त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण केले. मराठी अमदानीत हे परगण्याचे ठिकाण होते. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. दगड व चुन्याचा २० फूट उंचीचा, आठ फूट रुंदीचा दगडी बांधकामातील तट चांगल्या स्थितीत आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेसात एकर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. किल्ल्यावर धान्यकोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी दिसून येतात. येथून सावित्रीचे नयनमनोहर दृश्य दिसते. 

गोपाळगडअंजनवेल : येथील एन्रॉन प्रकल्प खूपच गाजला. अंजनवेल येथील ताठरखानबाबा यांचा ३०० वर्षांपूर्वीचा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जवळील धोपावे येथून दापोलीसाठी फेरीबोट आहे. आपल्याबरोबर गाडी नेण्याची व्यवस्था येथे आहे. 
मोडकाघर फाटा : येथून वेळणेश्वर व हेदवी, तसेच तवसाळ येथे जाता येते. येथे बोट क्लब आहे. 

पेवे : येथे झोलाई देवी मंदिर, तसेच जमलशाहबाबा दर्गा ही दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. 

रोहिला : हेदवीपासून सात किलोमीटर अंतरावर सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलीकडे सुरूबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत. 

तवसाळ : हेदवीपासून १२ किलोमीटर अंतरावर जयगडच्या बाजूला दक्षिणेस हे समुद्रकिनारी असलेले एक सुंदर ठिकाण आहे. शास्त्री नदीच्या मुखावर हे ठिकाण आहे. समोरच जयगड या जलदुर्गाचे दर्शन होते. तवसाळ हा छोटा आणि कमी गर्दीचा किनारा आहे. येथून शास्त्री नदीत (जयगड खाडी) नौकानयनाची सोय उपलब्ध आहे. तसेच पर्यटकांसाठी मासे पकडण्याची सोय करण्यात आली आहे. या खाडीतून सूर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे. 

वाशिष्ठी नदी

रम्य वाशिष्ठी परिक्रमा :
धार्मिक, तसेच अभ्यास म्हणून नर्मदा परिक्रमा, कृष्णा परिक्रमा करणारे भरपूर प्रवासी आहेत; पण वाशिष्ठी नदीची परिक्रमा हीपण निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर दर्शन घडविते. नदीची लांबी सुमारे ७० किलोमीटर असून, ती पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतील कुंभार्ली घाटाच्या बाजूच्या दरीत ९०० मीटर उंचीवर तिचे उगमस्थान आहे.. चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली या तालुक्यांतून ती वाहत जाते. कोयना जलविद्युतकेंद्राच्या पाण्याचा विसर्ग अलोऱ्याजवळ या नदीत होतो. त्यामुळे या नदीचे पाणी गोड झाले आहे. या नदीच्या किनाऱ्यावर मोठी, बहुविध जैवविविधता आढळते. मगरींचे वास्तव्य हे या नदीमधील मुख्य आकर्षण. या नदीच्या खोऱ्यात क्षेत्र परशुराम, दोणवली, मालदोली, मोरवणे, १८०० वर्षांपूर्वीची पन्हाळेकाजी येथील बौद्ध व हिंदू लेणी, दाभोळ बंदर, गोपाळगड, गोवळकोट अशी पर्यटन ठिकाणे आहेत. वाशिष्ठीला मिळणारी खेडजवळून वाहणारी जगबुडी ही मोठी नदी आहे. नावाप्रमाणे तिला पावसाळ्यात प्रचंड पूर येऊन आसपासच्या भागात ती थैमान घालते. जगबुडीच्या उगमाजवळ कोयनेच्या पर्जन्यक्षेत्रातील उच्चतम पावसाची नोंद होते. मुळातच पुरातन काळापासून या नदीच्या काठावर अनेक राजवटी होऊन गेल्या. येथे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणे आहेत. आदिलशाही राजवटीत या नदीतून व्यापारउदीम चालत होता. केरळला मागे टाकील एवढा समृद्ध किनारा या नदीला मिळाला आहे. मगरींचा मोठा अधिवास असलेले हे एकमेव ठिकाण आहे. चिपळूण येथील इतिहासतज्ज्ञ, पत्रकार धीरज वाटेकर व त्यांच्या मित्रमंडळींनी यात पुढाकार घेऊन वाशिष्ठीची परिक्रमा करून तिचे अनेक पैलू पुढे आणले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन केरळला नक्कीच मागे टाकेल. नदीच्या दोन्ही तीरांवर अनेक पुरातन व ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ही परिक्रमा पर्यटकांना नक्कीच आनंद देईल. (याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाशिष्ठी नदी

कसे जाल गुहागर येथे?
सागरी महामार्गामुळे आपल्या छोट्या गाडीसह फेरीबोटीचा वापर करून दापोलीपासून जयगडपर्यंत जाता येते. चिपळूणला रेल्वे स्टेशन असून, ते उत्तर दक्षिण भारताशी जोडलेले आहे. गुहागर, वेळणेश्वर येथे राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स व निवासी व्यवस्था आहे. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जाण्यास योग्य. 

(या भागासाठी चिपळूणचे पर्यटनविषयक अभ्यासक धीरज वाटेकर यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZZQCB
Similar Posts
निसर्गाचा चमत्कार - बामणघळ गुहागरजवळच्या बामणघळ परिसरातला निसर्गाचा चमत्कार पाहून थक्क व्हायला होतं. समुद्राच्या किनाऱ्यापासून कातळात पडलेल्या या उभ्या अरुंद भेगेतून लाटांचं पाणी वेगाने आत घुसतं आणि तसंच काही फूट वर उसळतं. या भन्नाट ठिकाणासह ‘चला, भटकू या’ च्या आजच्या भागात गुहागरच्या निसर्गरम्य परिसराची सैर...
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग तीन ‘करू या देशाटन’ या सदरात सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात पाहू या संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल....
रमणीय रत्नागिरी – भाग ६ (दापोली तालुका) ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरीच्या दापोली तालुक्याच्या किनारपट्टीवरचा उत्तर भाग पाहिला. आजच्या भागात पाहू या त्या तालुक्याच्या उर्वरित भागातील ठिकाणे...
रमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग सात (खेड, मंडणगड) ‘करू या देशाटन’ सदरात आज रत्नागिरी जिल्ह्याबद्दलचा शेवटचा भाग. त्यात पाहू या खेड व मंडणगडच्या आसपासची ठिकाणे....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language